नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील एका सेवानिवृत्त अधिका-यास तब्बल ९२ लाख रूपयांना गंडविले आहे. अवघ्या तीन महिन्यात ही गुंतवणुक करण्यात आली असून मुद्दलसह परतावा पदरात न पडल्याने सेवानिवृत्ताने पोलीसांत धाव घेतली आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंदनगर भागात राहणा-या ६७ वर्षीय सेवानिवृत्त अधिका-याने याबाबत फिर्याद दिली आहे. सदर अधिकारी काही वर्षांपूर्वी वीज कंपनीतून निवृत्त झाले असून गेल्या एप्रिल महिन्यात सायबर भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. टी फोर फायर्स व्हिजडम क्लब नावाच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये सदर अधिका-यास समाविष्ट करून घेत भामट्यानी हा गंडा घातला. या ग्रुपमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवणुकीबाबत चर्चा होत होती. सदस्यांकडून मोठा परतावा मिळाल्याचा दावा करण्यात येत असल्याने अधिकाºयाने चॅटींगमध्ये सहभाग नोंदविल्याने भामट्यांनी त्यांच्याशी वेळोवळी संपर्क साधला.
व्हॉटसअप कॉलवरून संपर्क साधत भामट्यांनी त्यांना पाठविलेल्या लिकच्या माध्यमातून गुंतवणुक करण्यास भाग पाडले. तिन महिन्याच्या काळात सदर अधिकाºयाने तब्बल ९२ लाख २ हजार ४४७ रूपयांची गुंतवणुक केली. मात्र कुठलाही परतावा अथवा गुंतवणुकीची रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे सदर अधिकाºयाने संबधीताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.