नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शाळेतील विद्यार्थीनीशी शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका नामांकित विद्यालयात उघडकीस आला. मुलींनी आपबिती मुख्याध्यापिकांसमोर कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, संशयिताने अन्य मुलींचीही छेड काढल्याचे पुढे आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांनी शिक्षकास अटक केली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर दौलतराव चव्हाण (५६ रा.कामटवाडा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित शिक्षकाचे नाव आहे. संशयित जुना मुंबई आग्रारोडवरील एका संस्थेच्या कन्या विद्यालयात हा प्रकार घडला. इयत्ता ७ वीतील काही मुलींची संशयिताने छेड काढल्याचा प्रकार महिला व बालकल्याण विभागाचा निदर्शनास आला होता. वसतीगृहातील मुलींनी याबाबत तक्रार दिल्याने या विभागाने चौकशीचे आदेश दिले होते.
संस्थेसह मुख्याध्यापकांकडून चौकशी सुरू असतांनाच गेल्या शनिवारी (दि.९) सकाळच्या सत्रात संशयिताने ९ वी ब मधील विद्यार्थीनीशी गैरवर्तन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. विद्यार्थीनीने थेट मुख्याध्यापिकेस सदरचा प्रकार कथन केल्याने त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांनी सदर शिक्षकास बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.