नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-मेडिकल स्टोअर्स मध्ये शिरून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह मोबाईल, चॉकलेट व साबनाचे बॉक्स चोरून नेले. ही घटना जुना मखमलाबाद नाका भागात घडली असून यात सुमारे १८ हजाराच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तेजस राजेंद्र सावंत (रा.सावंत चाळ,जुना मखमलाबाद नाका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सावंत यांचे जुना मखमलाबाद नाका भागात आशिर्वाद नावाचे मेडिकल स्टोअर्स आहे. गेल्या बुधवारी (दि.२५) रात्री ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी दुकानात शिरून गल्यातील सात हजाराची रोकड मोबाईल, कॅटबरी चॉकलेटचे तीन बॉक्स तसेच साबन असा सुमारे १७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
जागेच्या वादातून धाकल्याने थोरल्या भावास बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-जागेच्या वादातून धाकल्याने थोरल्या भावास बेदम मारहाण केल्याची घटना जेलरोड भागात घडली. या घटनेत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने थोरला भाऊ जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश सांगळे असे गुन्हा दाखल करण्यात आलल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत केशव सांगळे यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व फिर्यादी दोघे संख्ये भाऊ असून त्यांच्यात छत्रपती संभाजी नगर मार्गावरील लॉन्सच्या जागेवरून वाद सुरू आहे. केशव सांगळे गुरूवारी (दि.३) कामावरून आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. जेलरोड भागातील योयो वाईन्स दुकानासमोर चारचाकीतून आलेल्या संशयित प्रकाश सांगळे यांनी वाट अडवित केशव सांगळे यांना मारहाण केली. या हाणामारीत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने केशव सांगळे जखमी झाले आहेत. अधिक तपास हवालदार कु-हाडे करीत आहेत.
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
दिपक अजय धोत्रे (२७ रा. बिल्डींग नं.०५ घरकुल योजना चुंचाळे ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. धोत्रे याच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास दोन वर्षाकरीता तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना बुधवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास तो आपल्या राहत्या घरात मिळून आला. याबाबत एमआयडीसी चौकीचे अंमलदार संदिप खैरणार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.