नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डॉक्टर असल्याचे भासवून दांम्पत्याने एकास लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलच्या साहित्य खरेदीसाठी हात उसनवार व बँक कर्ज घेऊन ही आर्थीक फसवणूक केली आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरले न गेल्याने ठकबाज दांम्पत्याची तोतयागिरी समोर आली असून फसवणूक झालेल्या जामिनदाराने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाष उपासणी व नेहा उपासणी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाज दांम्पत्याचे नाव आहे. याबाबत रफिक नबीलाल सोंबरे (रा.अन्नपुर्णा अपा.कॉलेजरोड) यांनी फिर्याद दिली आहे. सोंबरे यांच्या सन २०१८ मध्ये संशयित दांम्पत्याशी परिचय झाला होता. अभिलाष उपासणी याने डॉक्टर असल्याचे भासवून सोंबरे कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. दोन्ही कुटुंबियांचे एकमेकांकडे जाणे येणे असल्याने उपासणी यांनी नवीन हॉस्पिटल सुरू करण्याची कल्पना सुचविली मोठा मोबदला देण्याचे आमिष दाखवून सोंबरे यांच्याकडून त्यांनी हॉस्पिटलच्या साहित्य खरेदीसाठी साडे बावीस लाख रूपये स्विकारले. यानंतरही वेगवेगळी कारणे सांगून या दाम्पत्याने सोंबरे यांच्या ओळखीचा फायदा उचलत कॉसमॉस बँकेच्या शरणपूर शाखेकडून पंधरा लाख रूपयांचे कर्ज घेतले.
या कर्ज प्रकरणावर सोंबरे यांनी जामिनदार म्हणून सह्या केल्या. सन. २०१८ ते २०२० दरम्यान बँकेची परतफेड केली नाही. हप्ते थकल्याने बँकेने कर्ज प्रकरणाची चौकशी केली असता संशयिताने बनावट कागदपत्राच्या आधारे डॉक्टर असल्याचे भासवून कर्ज घेतल्याचे समोर आले. याप्रकरणात सांबरे यांना रोखीत दिलेले व जामिनदार राहिलेल्या कर्जाची रक्कम असा ३७ लाख ५० हजार रूपयांना गंडा घालण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.