नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किरकोळ वादातून सतरा वर्षीय मुलावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडनेर गेट येथील केंद्रीय विद्यालय परिसरात घडली. या घटनेत फायटर व बेल्टने मारहाण करण्यात आल्याने सदर मुलगा जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हितेन बेद (रा.जयभवानी रोड,ना.रोड) व त्याचे दहा साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अनिल मोतीराम गायकवाड (रा.मुरलीधरनगर,पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड यांचा सतरा वर्षीय मुलगा नरेश गायकवाड यांचा संशयिताशी किरकोळ वाद झाला होता.
या वादाचा राग मनात धरून संशयितांनी हा हल्ला केला. बुधवारी (दि.९) दुपारी संशयित टोळक्याने नरेश गायकवाड यास वडनेर गेट येथील केंद्रीय विद्यालयासमोर गाठून शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेत फायटर व बेल्टने मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक विशाल सपकाळे करीत आहेत.