नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आयकर विभागात अधिकारी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने बेरोजगारास १५ लाख ५१ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने व संशयिताने पैसे परत न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश चंद्रभान निकम (रा.पारेगाव ता.चांदवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत भाऊसाहेब संतू आंबेकर (रा.सदगुरूनगर, केजे मेहता हायस्कूलजवळ ना.रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आंबेकर यांची संशयिताशी २०२२ मध्ये भेट झाली होती. या भेटीत संशयिताने आयकर विभागात चांगल्या ओळखी असल्याचे भासवून आंबेकर यांचा मुलगा प्रतिक आंबेकर यास आयकर विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. थेट असिस्टंट सेल्स टॅक्स ऑफिसर पदावर नोकरी मिळवून देण्याची ग्वाही देत संशयिताने आंबेकर कुटुंबियांचा विश्वास संपादन केल्याने ही फसवणुक झाली.
ठरल्याप्रमाणे आठ लाख रूपयांची रोकड व ऑनलाईन अशी १५ लाख ५१ हजाराची रक्कम संशयितास अदा करण्यात आली. २०२३ मध्ये संशयिताने पोस्टाने जॉईनिंग ऑर्डर पाठविली. मात्र ही ऑर्डर बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने संशयिताने वरिल पदावर पोस्टींग मिळवून देण्याची हमी देत पुन्हा दीड लाख रूपये उकळले. या घटनेस तीन वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने व संशयिताने पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याने आंबेकर यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.