नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडीमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत म्हसरूळ व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मखमलाबाद शिवारातील कचरू लक्ष्मण लिलके (रा.कपालेश्वर रो हाऊस,भगवानबाबानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लिलके कुटुंबिय २९ जून ते ८ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा उचकटून व खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे व भारत गॅसचे सिलेंडर असा सुमारे ३३ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.
घरफोडीचा दुसरा प्रकार औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडला. पंडीत ग्यानदेव पगार (रा.स्वामी वास्तू रो हाऊस, राधाकृष्ण नगर,अशोकनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पगार कुटूंबिय गेल्या १२ मार्च ते ७ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व देवघरातील तांबे पितळाची भांडी असा सुमारे ८० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरन नेला. .याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.