नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शेअर्स इन्व्हेस्टमेंट व्यवसायात गुंतवणुक करणे शहरातील काही तरूणांना चांगलेच महागात पडले आहे. एका महाठगाने दरमहा जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून तरूणांची फसवणूक केली असून, त्यातील तीन जणांनी पोलीसात धाव घेतली आहे. संशयितांने सव्वा तीन लाख रूपयांना गंडा घातल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिध्दार्थ देशमुख (रा.गंगापूररोड) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत मयुर विनायक मोरे (२२ मुळ रा.मुंजवाड सटाणा हल्ली दत्तचौक गंगापूररोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. संशयिताने गंगापूररोड भागात गोल्डन ब्रिक्स एंटरप्रायझेस नावाची फर्म सुरू करून हा उद्योग केला. २०१८ मध्ये संशयिताने मोरे यांची भेट घेतली होती. यावेळी शेअर्स इन्व्हेस्टमेंट व्यवसायात गुंतवणुक केल्यास दरमहा सहा टक्के व्याजाचे आमिष दाखविले. वेगवेगळी प्रलोभने दाखवित विश्वास संपादन केल्याने १ सप्टेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान मोरे यांनी संशयिताकडे दोन लाख रूपयांची गुंतवणुक केली. काही काळ त्याने नियमीत परवाही दिली.
त्यानतर परतावासह मुद्दल देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने हा प्रकार अखेर पोलीसात पोहचला आहे. मोरे यांच्यासह संशयिताने याच प्रकारे दिपाली शिंदे व अश्विनी सलोखे यांचीही फसवणुक केली असून या प्रकरणात सुमारे ३ लाख २९ हजार ५६० रूपयांची फसवणुक झाली आहे. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत. दरम्यान संशयिताने याप्रकारे अनेकांना गंडविल्याचे बोलले जात असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.