नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून रिक्षासह लोखंडी अँगल, तार व ट्रॅक्टरची कपलींग असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र वसंत बोंडवे (३५) व सद्दाम हसन कोकणी (२४ रा. दोघे वसंतदादानगर,आडगाव शिवार) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत दत्तू मोतीराम शिंदे (५० रा.जुना पाझर तलाव शिंदे वस्ती आडगाव शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांचे आळंदी कॅनोल भागात शेत जमिन आहे.
या शेतातील द्राक्ष बाग मोडण्यात आल्याने लोखंडी अँगल व तार उघड्यावर काढून ठेवण्यात आली होती. सदर ठिकाणचे शेती उपयुक्त साहित्य संशयित रिक्षामध्ये भरतांना मिळून आले. परिसरातील शेतकºयांनी धाव घेतल्याने दोघे संशयित पोलीसांच्या हाती लागले असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.