नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आषाढी एकादशी आणि मोहरम सणानिमित्त सर्वत्र ड्राय डे घोषीत केलेला असतांना राजरोसपणे दारू विक्री करणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून सुमारे दीड हजार रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून संशयितास मुद्देमालासह अंबड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने केली.
किशोर सुनिल राक्षे (रा.मोरवाडी,सिडको) असे कारवाई करण्यात आलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. आषाढी एकादशी निमित्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशाने रविवारी (दि.६) ड्राय डे घोषीत करण्यात आला होता. शहरातील सर्वच दारू दुकाने बंद ठेवण्यात आलेली असताना महामार्गावरील टोयाटो शोरूम समोरील उड्डाणपूलाखाली एक तरूण बेदायदा दारूची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
युनिट २ च्या पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या असता त्याच्या ताब्यातील प्लॅस्टीक गोणीत देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. संशयिताच्या ताब्यातून १ हजार ६१० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्यास मुद्देमालासह अंबड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. याबाबत अंमलदार प्रविण वानखेडे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार संगम करीत आहेत.