नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मोहरम सण रविवारी (दि.७) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्त असतांनाही विहीतगाव येथील लॅमरोड भागात मात्र सरबत वाटप कार्यक्रमात पॅलेस्टाईन देशाचा झेंडा फडकविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत मंडळाच्या पदाधिका-यांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आषाढी एकादशी आणि मोहरम सण रविवारी शहरासह जिह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुठेही गालबोट लागू नये यासाठी दोन्ही पोलीस दलांच्या वतीने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. नाशिकसह मालेगाव मध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा बंदोबस्त दिवसभर कायम होता. मोहरम सणानिमित्त वेगवेगळया मंडळाच्या वतीने मुस्लीम बांधवांना सरबत वाटप करण्यात आले.
मात्र विहीतगाव येथील लॅमरोड भागात एका मंडळाच्या वतीने सरबत वाटप कार्यक्रमात स्वातंत्र्यासाठी लढा देणा-या पॅलेस्टाईन नागरीकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी झेंडा फडकविण्यात आल्याने खळबळ उडाली. अंमलदार प्रमोद ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडळाच्या नऊ पदाधिकाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार योगेश देवरे करीत आहेत.