नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदूरनाका भागात वडिलांच्या मित्राने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. संशयिताने बाथरूममध्ये बोलावून घेत हे कृत्य केले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे.
संतोष सुदाम शेलार (२८ रा.स्वामी समर्थ नगर,छत्रपती संभाजीनगर रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकाच भागातील रहिवासी असून तो पीडितेच्या वडिलांचा मित्र आहे. शनिवारी (दि.७) रात्रीच्या वेळी मुलगी आपल्या अंगणात खेळत असतांना संशयिताने तिला नजीकच्या पत्रावळी कारखान्याच्या बाथरूममध्ये घेवून जात हे कृत्य केले.
बाथरूममध्ये बोलावून घेत संशयिताने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत मुलीचा विनयभंग केला. ही बाब मुलीने घरी जावून आईला सांगितल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे. अधिक तपास उफनिरीक्षक मयुर निकम करीत आहेत.