नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने नातेवाईकांनी एका बेरोजगारास तब्बल चौदा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन चार वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याच्या मोबदल्यात दिलेले धनादेश बँकेतून न वटता परत आल्याने बेरोजगाराने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निळकंठ गोसावी, प्रिया गोसावी व महेश गोसावी (रा.सर्व कैलास कुंज,कोपरखैरणे ठाणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत उज्वल सुभाष गोसावी (रा.वृंदावननगर,जत्रा नांदूर लिंकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी उज्वल गोसावी यांचे संशयित महेश गोसावी हे मामा आहेत. खासगी नोकरी करणाºया उज्वल गोसावी यांना चार ते पाच वर्षापूर्वी नातेवाईक असलेल्या संशयितांनी रेल्वेत तिकीट तपासणीस पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. या कामाच्या मोबदल्यात चौदा लाख रूपये देण्याचे ठरल्याने तक्रारदार उज्वल गोसावी यांनी संबधीताकडे सर्व रक्कम सुपूर्द केली होती.
कालांतराने बनावट नियुक्तीपत्र देवून उज्जव गोसावी यांना ट्रेनिंगसाठी प्रथम दिल्ली व त्यानंतर प्रयागराज येथे पाठविण्यात आले होते. मात्र सदर ठिकाणी संशयितांचा बनाव समोर आला. त्यामुळे उज्जव गोसावी यांनी पैश्यांचा तगादा लावला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये मामा महेश गोसावी यांच्या घरी बोलावून घेत पैश्यांची तजवित करीत असल्याचे सांगून उज्वल गोसावी यांना निळकंठ व प्रिया गोसावी यांनी धनादेश दिले होते. ते बँकेत न वटल्याने पुन्हा साई इन्फोटेक या फर्मच्या नावे दुसरे धनादेश देण्यात आले. मात्र तेही वटले नाही त्यामुळे उज्वल गोसावी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक निकम करीत आहेत.