नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) पत्नीस समजविण्यासाठी सासरी गेलेल्या मेव्हण्यास शालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना चेहडी पंपीग येथे घडली. या घटनेत लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याने मेव्हणा जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय राजेंद्र भदे (रा.चेहडी पंपीग,ना.रोड) व त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सोनू बाळासाहेब माळी (रा.बेलतगव्हाण ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. माळी दांम्पत्याचा किरकोळ वाद झाला होता. रागाच्या भरात तीन मुलींना सोबत घेवून पत्नी चेहडी पंपींग येथे आपल्या माहेरी निघून गेली असता ही घटना घडली. माळी पत्नीस समजाविण्यासाठी आपल्या सासरी जात असतांना ही घटना घडली.
शालक सोनू भदे व त्याच्या दोन साथीदारांनी भगवा चौक भागात मेव्हणा सोनू माळी याची वाट अडवित शिवीगाळ केली. यावेळी तू येथे कशाला आला असा जाब विचारत त्रिकुटाने माळी यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याने माळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बिटको रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.