नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, गेल्या दोन दिवसात वेगवेगळया भागात राहणारे पाच मुले बेपत्ता झाले आहेत. त्यात दोन शाळकरी मुलांसह तीन मुलींचा समावेश आहे. कुणी तरी मुलांना पळवून नेल्याची भिती पालकांनी व्यक्त केल्याने याप्रकरणी म्हसरूळ,मुंबईनाका अंबड व सातपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुकेणकरनगर भागात राहणा-या अल्पवयीन मुलगी गुरूवार (दि.३) पासून बेपत्ता आहे. कुणी तरी तिला पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत. दुसरा प्रकार पखालरोड भागात घडला. मातोश्री सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक शाळेत गेलेले दोन मुले बुधवार (दि.२) पासून बेपत्ता आहेत. दोन्ही मुलाना कुणीतरी पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
तिसरी घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणारी अल्पवयीन मुलगी गुरूवार (दि.३) पासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अजिनाथ बटूळे करीत आहेत. तर चुंचाळे शिवारातील म्हाडा कॉलनीत राहणारी मुलगी गुरूवार (दि.३) पासून बेपत्ता आहे. तिलाही कुणीतरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक लाड करीत आहेत.