नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुठलेही कारण नसतांना एकाने २५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिंडोरीरोडवर घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे.
विकी संजय जाधव (२१ रा.अवधुतवाडी,दिंडोरीरोड) असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. याबाबत पप्पू सोनू पवार (२५ रा.गौंडवाडी फुलेनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. पवार मंगळवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास परिसरातील दिंडोरीरोड भागात गेला असता ही घटना घडली. सुभाष भैय्या यांच्या भंगार दुकानासमोरून तो पायी जात असतांना समोरून आलेल्या संशयित परिचीताने कुठलेही कारण नसतांना पवार यांना शिवीगाळ करीत आता तुला मारूनच टाकतो असे म्हणत धारदार चॉपरने हल्ला केला.
या घटनेत पवार याच्या डाव्या हातावर व मनगटाजवळ वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.