नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गहाळ मोबाईलचा गैरवापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. सेवानिवृत्त मोबाईल धारकाच्या तीन बँकाच्या खात्यातील सुमारे पावणे पाच लाख रूपयांची रोकड परस्पर लांबविण्यात आली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास चिमणराव शेळके (७४ रा.मनोहर गार्डन जयभवानीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सेवानिवृत्त असलेले शेळके यांचा मोबाईल काही दिवसांपूर्वी देवळाली गाव येथील सोमवार बाजार परिसरात हरवला आहे.
गेल्या २३ ते २७ जून दरम्यान अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गहाळ मोबाईलचा गैरवापर करीत मोबाईल नंबर लिंक असलेल्या एसबीआय, युनियन व पंजाब नॅशनल बँक खात्यातील सुमारे ४ लाख ८९ हजार ८८८ रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. अधिक तपास निरीक्षक फुलपगारे करीत आहेत.