नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरूणाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात स्नॅप चॅट या सोशल साईटच्या माध्यमाातून तिची ओळख सिध्दार्थ म्हसदे नामक युवकाशी झाली होती. दररोजच्या चॅटीगमुळे दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने हा प्रकार घडला. संशयिताने या काळात मुलीशी प्रेमाचे नाटक करीत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्याने याबाबत पोलीसात धाव घेण्यात आली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पुरी करीत आहेत.
सात वर्षीय मुलीचा विनयभंग
जुने नाशिक भागात घरात घुसून एकाने सात वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. आई वडिल घरी आहेत का अशी चौकशी करण्यासाठी घरात आलेल्या अनोळखी इसमाने सात वर्षीय मुलीचा विनयभंग केला. मुलीने आजोबांना आवाज देण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिचे तोंड दाबून अश्लिल कृत्य केले असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक दिपक तोडे करीत आहेत.