नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारमधून मालकाची दहा लाख रूपयांची रोकड लांबविणा-या दोघा नोकरांना बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश आले आहे. महामार्गावरील मंगरूळ फाटा भागात शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने दुचाकीस्वार राजस्थानी भामट्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्या ताब्यातून दुचाकीसह रोकड असा सुमारे दहा लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जगतपाल बुधाराम लालर (२४) व सुशिल शिशपाल राव (२२ रा दोघे सोनेडी जि.हनुमानगड राजस्थान हल्ली दत्ता सोसा.शिवाजीनगर टाकळीरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विनोद अशोक कंदोई यांनी फिर्याद दिली होती. कंदोई यांच्या कारमध्ये ठेवलेली दहा लाखाची रोकड चालक जगतपाल सिंग याने गेल्या ११ जून रोजी नातेवाईक असलेल्या व कंदोई यांच्याकडे नोकर म्हणून काम करणा-या साथीदाराच्या मदतीने पळवून नेल्याचे समोर आले होते. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याने युनिट १ पथक कामाला लागले होते. पथकाने संशयितांच्या गावी तसेच राजस्थान,हरियाणा व पंजाबच्या सिमेवर जावून शोध घेतला मात्र दोघे मिळून आले नाही. त्यामुळे खाली हात परतलेल्या पथकाने राज्यातच दोघांना हुडकून काढण्याचा प्रयत्न केला असता युनिटचे हवालदार महेश साळुंके व अंमलदार राहूल पालखेडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
दोघे संशयित चाळीसगाव येथून एमएच १५ जेएस १४७८ या दुचाकीवर चांदवड मार्गे नाशिकला येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगरूळफाटा भागात पथकाने सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळयात अडकले. पोलीस तपासात त्यांनी गुह्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह रोकड असा सुमारे १० लाख ६० हजार पाचशे रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत,सुदाम सांगळे,हवालदार महेश साळुंके,रोहिदास लिलके,कैलास चव्हाण, रमेश कोळी,उत्तम पवार,धनंजय शिंदे अंमलदार राहूल पालखेडे,नितीन जगताप,राम बर्डे, आप्पा पानवळ,मुक्तार शेख जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी किरण शिरसाठ व सुक्राम पवार आदींच्या पथकाने केली.