नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शासकिय नोकरीचे आमिष दाखवून पंचवटीतील बापलेकाने एका रिक्षाचालकास दोन लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही तसेच बापलेकाने पैसेही परत न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्कर पाटोळे व भाऊसाहेब पाटोळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बापलेकाचे नाव आहे. याबाबत दिपकमल सुरेश निकम (३ रा.महाराणा प्रताप चौक सिडको) या रिक्षाचालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. निकम सिडकोतील देवांग सर्कल रिक्षाथांब्यावरून व्यवसाय करतात डिसेंबर २०२० मध्ये त्यांची मित्र दिनेश निकम याची भेट झाली होती. या भेटी दरम्यान दिनेश निकम याने पंचवटीत राहणारे ओळखीतील भाऊसाहेब पाटोळे याचा मुलगा पुष्कर पाटोळे हा मुंबई मंत्रालयात नोकरीस असून तो गट ड मध्ये मुलाचे पैसे घेवून नोकरीला लावतो असे सांगितल्याने ही फसवणुक झाली.
दिपकमल व दिनेश निकम या मित्रांनी पाटोळे यांची भेट घेतली असता भाऊसाहेब पाटोळी यांनी नोकरीच्या मोबदल्यात पाच लाख रूपयांची मागणी केली. तीन महिन्यात ऑर्डर देण्यासाठी अॅडव्हान्स म्हणून दोन लाख रूपये द्यावे लागतील व उर्वरीत रक्कम काम झाल्यावर देण्याचे ठरले. शासकिय नोकरीच्या आमिषाला बळी पडत दिपकमल निकम यांनी ३१ जानेवारी २०२१ रोजी इंदूबाई पाटोळे यांच्या बँक खात्यात ९० हजार रूपये आरटीजीएसच्या माध्यमातून टाकले. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोख एक लाख संशयितांच्या स्वाधिन केले तर राहिलेले दहा हजार इंदूबाई पाटोळे यांच्या खात्यात भरणा करण्यात आले. मात्र यानंतर अनेक वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही. तसेच पैश्याचा तगादा लावूनही संशयितांनी पैसे परत न केल्याने दिपकमल निकम यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळे करीत आहेत.
………..