नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते सुनील बागूल यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून ते प्रसारित केल्याप्रकरणी टोळक्याने घरात घुसून सराफ व्यावसायीकास बेदम मारहाण केल्याची घटना काठेगल्लीत घडली. या घटनेत तोडफोड करीत टोळक्याने चार लाख रूपयांचे नुकसान केले असून गळयातील सोनसाखळीही चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल बागुल, सागर देशमुख, मामा राजवाडे,अमोल पाटील,लखन दोंदे,लखन झुडर्या व विलास सनसे (रा.सर्व रामवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत किशोर उर्र्फ गजू गोपालराव घोडके (रा.काठेगल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. शिवसेना नेते सुनील बागुल यांच्या गैरव्यवहाराविषयी घोडके यांनी व्हिडीओ बनविला होता. २७ जुलै रोजी तो सोशलमिडियावर व्हायरल झाला.
नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी तो काढून टाकण्यासाठी सांगितले होते. परंतु, घोडके यांनी तसे केले नाही. त्यामुळे सोमवारी (दि.३०) मध्यरात्री टोळक्याने हा हल्ला केला. संतप्त टोळक्याने घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत घोडके यांना लोखंडी पाईप व विटांनी बेदम मारहाण केली असून घरातील संसारोपयोगी वस्तूंची तोडफोड करीत सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. या घटनेत घोडके यांच्या गळयातील सोनसाखळी व घरात ठेवलेले एक लाख रूपये टोळक्याने चोरून नेल्याचा आरोपही करणयत आला आहे. अधिक तपास निरीक्षक कारंडे करीत आहेत.
………..