नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रिक्षातून आलेल्या टोळक्याने बसचालकास बेदम मारहाण केल्याची घटना मेळा बसस्थानक परिसरात घडली. रविवारी (दि.२९) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चालक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर दत्तराव लोखंडे (रा.अंबरवाडी ता. जिंतूर,परभणी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लोखंडे एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत असून नाशिक जिंतूर या शिवशाही बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. शनिवारी (दि.२८) सकाळी ते जिंतूर येथून एमएच ०९ ईएम १४६७ या शिवाशाही बसमध्ये प्रवासी घेवून नाशिकच्या दिशने रवाना झाले होते.
रविवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास चालक लोखडे मेळा मेळा बसस्थानक परिसरात बस घेवून आले असता प्रवेशद्वारा बाहेर एमएच १५ जेए ८३०२ या रिक्षातून आलेल्या चार जणांनी बस आडवित कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ करीत व चालक कॅबीनमध्ये शिरून लोखंडे यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश उमाप करीत आहेत.