नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून अॅटोरिक्षासह वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी सातपूर,नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातपूर येथील तुषार शेजवळ (रा.जगतापवाडी) याची अॅटोरिक्षा एमएच १५ एफयू ६२२० गेल्या गुरूवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास स्वारबाबा नगर येथील घोडके मटन शॉप समोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत. मोटारसायकल चोरीची पहिली घटना जेलरोड भागात घडली. दिनेश दत्तू पवार (रा.शिर्डी ता.राहता) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार गेल्या गुरूवारी (दि.२६) शहरात आले होते. जेलरोड येथील एमएसईबी सबस्टेशन भागात लावलेली त्यांची पल्सर एमएच १७ सीएस ७३०४ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कु-हाडे करीत आहेत.
दुसरी घटना आगरटाकळी येथे घडली. संदिप सुनिल वर्पे (रा.दत्तमंदिर शेजारी राहूल नगर,गांधीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वर्पे यांची पल्सर एमएच १५ जीटी ४८५७ गेल्या गुरूवारी (दि.२६) त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. तर दिपक वसंत गायकवाड (रा.हनुमाननगर) यांची पल्सर एमएच १५ जीवाय १८४४ गेल्या गुरूवारी (दि.२६) सकाळी गांधीनगर येथील प्राईड नेपच्युन या सोसायटीच्या पार्किगमधून चोरीस गेली. दोन्ही घटनांबाबत उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळया नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास जमादार बकाल करीत आहेत.