नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरासमोर पार्क केलेली दुचाकी समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना गंजमाळ परिसरात घडली. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद खुर्शिद शेख (रा.पोलीस चौकीसमोर गंजमाळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांची सुझूकी कंपनीची बर्गमॅन एमएच १५ एचझेड ०९७० दुचाकी गुरूवारी (दि.२९) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ही घटना घडली. अज्ञात समाजकंटकाने आर्थीक नुकसान व्हावे या उद्देशाने दुचाकीवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली.
या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून ही बाब वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.