नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सायबर गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता व्हॉटसअॅपवर एपीके फाईल पाठवून भामट्यांनी एका महिला बँक व्यवस्थापकास तब्बल आठ लाख रूपयांना गंडा घातला आहे. फाईल पडताळणी करीत असतांना सायबर भामट्यांनी बँकेच्या स्टाफ ओव्हर ड्राफ्ट अकाऊंटमधून ही रक्कम परस्पर काढून घेतली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ४७ वर्षीय महिला तक्रारदार या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. गेल्या ९ ऑगष्ट रोजी त्या सेवा बजावत असतांना भामट्यांनी त्यांना व्हॉटसअॅपवर बँकेचा लोगो असलेली एपीके फाईल पाठविली होती.
मुख्यालयाचा दस्तऐवज समजून त्यांनी त्यावर क्लिक केले असता ही फसवणुक झाली. भामट्यांनी बँकेच्या स्टाफ ओव्हर ड्राफ्ट अकाऊंटमधून दोन लाखाचे चार ट्रान्झेक्शन करून ८ लाखाची रक्कम परस्पर काढून घेतली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.