नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टेम्पो चालकाने वाहतूकीत चेपलेल्या तेलाच्या डब्यांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यापा-याने परत केलेले तेलाचे डबे चालकाने परस्पर विक्री केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल भागुराम वाघमारे (रा.काजुवाडी खोपोली जि.रायगड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रामचंद्र शांताराम पवार (रा.शिळफाटा खोपोली जि. रायगड) यानी फिर्याद दिली आहे. पवार यांचा सागर ट्रान्सपोर्ट नावाचा व्यवसाय असून संशयित त्यांच्या टेम्पोवरील चालक आहे. संशयित गेल्या बुधवारी (दि.११) रात्री पवार यांच्या मालकिच्या एमएच १४ एचजी ९०६० या टेम्पो मध्ये खोपोली येथील अलाना कंपनीतून सुमारे साडे वीस लाख रूपये किमतीचे तेलाच्या मालाची डिलेव्हरी करण्यासाठी नाशिकच्या दिशेने रवाना झाला होता.
बुधवारी रविवार पेठेतील श्रीराम ट्रेडर्स या एजन्सीच्या मार्केट यार्ड भागातील गोडावूनमध्ये ५०१ तेलाचे डब्यांपैकी ४११ डबे उतरविले. या ठिकाणी वाहतूकीत बहुतांश डबे चेपले गेल्याचे लक्षात आल्याने ९० डबे परत करण्यात आले होते. श्रीराम ट्रेंडर्सचे महेश ठक्कर यांनी याबाबत संपर्क साधून डबे कपंनीस परत करण्याची विनंती केली होती. सुमारे १ लाख ७५ हजार ९७१ रूपये किमतीचे तेल डबे संशयितांने परतीच्या प्रवासात कसारा घाट परिसरात परस्पर विक्री केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.