नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तहसिलदार पदावर नियुक्ती करण्याची ग्वाही देत भामट्यांनी एका बेरोजगारास तब्बल बारा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन अडिच वर्ष उलटूनही सरकारी नोकरी अथवा पैसे परत न मिळाल्याने बेरोजगाराने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल पेठकर,वजीर मुजावर व सोनाली मॅडम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत अक्षय अनिल झवर (रा.ढिकलेनगर,पंचवटी) या युवकाने फिर्याद दिली आहे. जानेवारी २०२४ मध्ये झवर यांची संशयितांशी भेट झाली होती. शासन दरबारी मोठ्या ओळखी असल्याचे भासवून संशयितांनी झवर यांना थेट तहसिलदार पदावर नियुक्ती मिळवून देण्याची ग्वाही दिल्याने ही फसवणुक झाली. उच्चपदस्थ सरकारी नोकरीच्या मोबदल्यात लाखोंची मागणी करण्यात आली.
त्यातील बारा लाख रूपये झवर यांनी रोख व ऑनलाईन स्वरूपात अदा केली आहे. अडिच वर्ष उलटूनही संशयितांनी नोकरी अथव पैसे परत न केल्याने झवर यानी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.