नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिगारेटचे पैसे दिले नाही या वादातून तीन जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना बेदम मारहाण करीत धारदार चाकूने भोसकल्याची घटना काझीगढी भागात घडली. या घटनेत दोन तरूण जखमी झाले असून पोलीसांनी एका रेकॉर्डवरील संशयितासह त्याच्या एका साथीदारास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर उर्फ मया शिवाजी घातके व अत्तार बादशाह शहा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांचा बंटी नामक साथीदार फरार झाला आहे. अटक केलेल्या दोघांपैकी मया घातके हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत अनंता राजेंद्र पाटील (२४ रा.अमरधामच्या बाजूला पंचवटी) या युवकाने फिर्याद दाखल केली आहे. पाटील व ऋतिक बाळासाहेब डोंगरे (२२ रा.शितळा देवी मागे,काझीगडी) हे दोघे मित्र बुधवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास अमरधाम गार्डनच्या कोपºयावर असलेल्या महावीर कौलकर यांच्या पान टपरीवर गेले असता ही घटना घडली.
सिगारेट घेवून दोघे मित्र टपरीजवळ उभे असतांना संशयित त्रिकुटाने त्यांना गाठले. तुम्ही सिगारेटचे पैसे का देत नाही असा जाब विचारत संशयितांना दोघा मित्रांना शिवागीळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी एकाने धारदार चाकूने दोघा मित्रांवर सपासप वार केले. या घटनेत पाटील व डोंगरे हे दोघे मित्र जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.