नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुलेनगर येथील महाराणा प्रतापनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८२ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे, पितळी भांडे व स्मार्ट वॉचचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसिंग उर्फ अनिल रघूनाथ पगारे (रा. सोनार गल्ली, महाराणा प्रताप नगर फुलेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पगारे कुटुंबिय मंगळवारी (दि.२४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटात ठेवलेली १५ हजाराची रोकड, सोन्याचे मंगळसुत्र तसेच देवघरातील पितळी साहित्य व स्मार्ट वॉच असा सुमारे ८१ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.
धारदार कोयता घेवून फिरणा-याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धारदार कोयता घेवून फिरणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या ही कारवाई पंचवटीतील मामा राजवाडे यांच्या कार्यालय परिसरातील रिक्षास्टॅण्ड भागात करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश दत्तू चारोस्कर (२६ रा.चैतन्य बेकरी मागे नवनाथनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित पंचवटीतील मामा राजवाडे यांच्या कार्यालय परिसरातील रिक्षास्टॅण्ड भागात कोयता घेवून फिरत असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२४) रात्री पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातील कोयता जप्त करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार अश्विनकुमार कुमावत यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार नांदुर्डीकर करीत आहेत.