नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोबाईल हॅक करून सायबर भामट्यांनी एकाच्या नावे परस्पर कर्ज काढून, रक्कम हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जाची रक्कम कोलकत्ता येथील ठकबाजांच्या बॅक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पैसे वर्ग झालेल्या खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश वर्मा, अदनान हुसेन व अकिब इस्माईल (रा.कोलकत्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित खातेदारांची नावे आहेत. याबाबत प्रकाश विठ्ठल येवले (रा.आम्रपाली लॉन्स मागे कामटवाडे) यांनी फिर्याद दिली आहे. येवले यांचा मोबाईल गेल्या गुरूवारी (दि.१९) सायबर भामट्यांनी हॅक केला होता. याकाळात भामट्यांनी येवले यांच्या बॅक खात्याचा गैरवापर करीत हा उद्योग केला. एचडीएफसी बॅकेच्या सातपूर शाखेतून परस्पर ऑनलाईन ४ लाख ९४ हजार ७५६ रूपयांचे पर्सनल लोन मिळविले.
ही रक्कम खात्यात जमा होताच भामट्यांनी एक लाख रूपये परस्पर वरिल तिघांच्या बँक खात्यात वर्ग केले असून याबाबतचा सदेश प्राप्त होताच येवले यांनी बॅक आणि पोलीसांशी संपर्क साधल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अधिक तपास निरीक्षक खैरणार करीत आहेत.