नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू झाला. ही घटना मखमलाबाद शिवारातील शिवमहाभगवती गॅस गोडावून भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल सटवा वाघमारे (मुळ रा.अंबरवाडी जि.परभणी हल्ली पाथर्डीगाव राजवाडा) असे मृत कामगाराचे नाव आहे. वाघमारे मखमलाबाद शिवारातील शिवमहाभगवती गॅस गोडावून भागात नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. सोमवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास ते नेहमी प्रमाणे सातव्या मजल्यावर काम करीत होते. फोनवर बोलत काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने ही दुर्घटना घडली.
या घटनेत वाघमारे सातव्या मजल्यावरून जमिनीवर कोसळल्याने गंभीर जखमी झाले होते. अन्य कामगारांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार प्रभाकर सोनवणे करीत आहेत.