नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना लाखोंना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवत भामट्यांनी साडे ५५ लाख रूपयांना गुंतवणुकदारांना फसविले असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एप्रिल महिन्यात शहरातील गुंतवणुकदारांशी भामट्यांनी संपर्क साधला होता. व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करीत भामट्यांनी गुंतवणुकदारांना शेअर मार्केट मधील गुंतवणुकीत जादा परताव्याचे आमिष दाखविले. या काळात संशयितांनी व्हॉटसअप कॉलद्वारे संभाषण करीत त्यांनी पाठविलेल्या लिंकमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडत ही फसवणुक करण्यात आली आहे.
सायबर भामट्यांच्या भुलथापांना बळी पडीत तक्रारदाराने ११ लाख ४६ हजार ५९२ रूपयांची तर अन्य तीघानी ४३ लाख ९५ हजार १३६ रूपये अशी ५५ लाख ४१ हजार ७२० रूपांची गुंतवणुक केली असून दीड दोन महिने उलटूनही मोबदला अथवा परतावा पदरात न पडल्याने गुंतवणुकदारांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.