नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बाली येथील सहलीचे आमिष दाखवत यात्रेसाठी प्रत्येकी पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐनवेळी यात्रा रद्द करीत पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात यात्रा कंपनीच्या तीन भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुर वाघ, शाम मराठे व कल्पेश पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अभिमन त्र्यंबक पवार (६६ रा.सवी शंकर मार्ग वडाळा शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. पंचवटीतील निमाणी परिसरात असलेल्या शौर्य यात्रा कंपनीच्यावतीने बाली यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेसाठी पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी यात्रा कंपनीचे कार्यालय गाठून माहिती जाणून घेतली होती. या भेटीत संशयितांनी पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांकडून प्रती सिट पैसे जमा केले होते. या यात्रेची तारीखही निश्चित करण्यात आली होती.
यात्रेस जाण्याची तयारी सुरू असतांनाच संशयिताने यात्रा रद्द केली. पुढील तारीख देत त्याने काही दिवस लोटले मात्र त्यानंतर ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देत टोलवाटोलवी केली. यामुळे पवार यांनी पोलीसात धाव घेतली असून तक्रारीत ६० हजार रूपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उफनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.