नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घटस्फोटीत डॉक्टर महिलेस एकाने लग्नाचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाची तारिख ठरवूनही भामट्याने संपर्क तोडल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून या घटनेत भामट्याने साडे सात लाख रूपये ऑनलाईन स्विकारत महिलेची आर्थीक फसवणुक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल संजय देवरे (३५ रा.धात्रक फाटा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत मुळच्या जळगाव जिह्यातील व सध्या मुंबईतील नामांकित शासकिय हॉस्पिटल मध्ये सेवा बजावणा-या ३५ वर्षीय डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे. पीडितेचा पहिल्या पतीशी घटस्फोट झाला असून तिला पंधरा वर्षाचा मुलगा आहे. आरोग्य विभागात नोकरीस असल्याने वैद्यकीय अधिकारी असलेल्या पीडितेचे नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात येणे जाणे आहे. या ठिकाणी संशयिताची तिची ओळख झाली होती. काही महिन्यापूर्वी महिलेने जीवनसाथी मेट्रोमोनी या ऑनलाईन साईटवर नोंदणी केल्याने हा प्रकार घडला. फेसबुकच्या माध्यमातून संशयिताने प्रथम चॅटींग करीत महिलेचा नंबर मिळविला. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होवून संभाषण वाढले. या काळात संशयिताने गिरगाव चौपाटी भागात महिलेची भेट घेत लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर महिलेच्या मुलाची अचानक तब्बेत बिघडल्याने संशयिताने मुंबईत धाव घेवून दवाखान्यात उपस्थिती लावत मायलेकाची विशेष काळजी घेत असल्याचे भासवून विश्वास संपादन केला.
यानंतर संशयिताने आपल्या कुटुंबियांशी बोलणे करून देत तसेच नाशिकमधील एका हॉटेलमध्ये भेट घडवून आणत लग्नाची तारीखही ठरवली. या दौ-यात त्याने दिंडोरी येथील एका हॉटेलवर घेवून जात आपलेच हॅाटेल असल्याचे पीडितेस भासविले. यानंतर मात्र वेगवेगळे बहाणे करून संशयिताने महिलेकडून ऑनलाईन सात लाख ६० हजार रूपये उकळले आहे. अवघ्या दोन महिन्यांवर लग्न आल्याने वधू पक्षाकडील नातेवाईकांनी संशयिताची चौकशी केली असता त्याचा बनाव समोर आला आहे. संशयिताने दिलेल्या पत्यावरही तो वास्तव्यास नसल्याचे पुढे आल्याने पीडितेने त्याच्याशी संपर्क केला मात्र तो होवू शकला नाही. आर्थीक फसवणुकीच्या उद्देशाने ठकबाजाने लग्नाचा बहाणा केल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.