नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारमधून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोघा मित्रांना मारहाण करीत लुटल्याची घटना समोर आली आहे. निर्जनस्थळी घेवून जात चार जणाच्या टोळक्याने दोघा मित्रांची अंगझडती घेत रोकडसह मोबाईल, घड्याळ अंगठी असा ऐवज बळजबरीने काढून घेतला. या वेळी भामट्यांनी फोन पे च्या माध्यमातून बॅक खात्यातील आठ हजाराची रक्कमवरही डल्ला मारला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितेश रमाकांत शर्मा (मुळ रा. उत्तरप्रदेश हल्ली विष्णाजी नागरे,चित्तेगाव फाटा ता.निफाड) यांनी फिर्याद दिली आहे. शर्मा व गुरूद्विप हे दोघे मित्र शनिवारी (दि.२१) नाशिकरोड भागात गेले होते. रात्रीच्या वेळी दोघे मित्र परतीच्या प्रवासासाठी बसस्थानक परिसरात उभे असतांना ही घटना घडली. कारमधून आलेल्या चार जणांच्या टोळक्याने दोघांना कुठे जायचे अशी विचारपूस करीत चित्तेगाव येथे सोडतो असे सांगितले. त्यामुळे दोघे मित्र कारमध्ये बसले असता ही लुटमार झाली.
भामट्यांनी मातोश्री कॉलेज परिसरातील ओसाड जागेवर घेवून जात एकास बेदम मारहाण करीत दुस-यास धमकावित दोघांची अंगझडती घेतली. यावेळी दोघांच्या खिशातील रोकड, मोबाईल व मौल्यवान वस्तू हिसकावून घेतले. तसेच मोबाईलमधील फोन पेअॅपच्या माध्यमातून आठ हजार रूपये अन्य खात्यात वर्ग केले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.