नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दूध घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एकास शेजा-यांनी बेदम मारहाण केल्याची घटना चेहडी पंपीग येथे घडली. या घटनेत लाकडी बॅटसह लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आल्याने सदर इसम जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक चव्हाण, साई चव्हाण व वृषाली चव्हाण अशी शेजा-यास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत बाळकृष्ण चिधू सानप (रा.चेहडी पंपीग,सिन्नर फाटा) यानी फिर्याद दिली आहे. संशयित आणि तक्रारदार एकाच इमारतीतील रहिवासी असून त्यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. सानप शुक्रवारी (दि.२०) सकाळी दुध घेण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
चेहडी पंपीग येथील मारूती मंदिर परिसरातून ते दूध घेण्यासाठी पायी जात असतांना कारमधून आलेल्या कुटुंबियांनी त्यांची वाट अडवत शिवीगाळ केली. यावेळी संशयितांनी कार मधून लाकडी बॅट व लाठ्याकाठ्या काढून सानप यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सानप गंभीर जखमी झाले असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.