नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघा भामट्यानी एका पेंटरला दीड लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्ज एक महिन्याच्या आत बंद करण्याचे ग्वाही देत भामट्यांनी हा गंडा घातला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष कांबळे व सुमित देवरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी बापू बाळू इंगळे (३९ रा.मोरेमळा, बालाजीनगर जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. इंगळे यांचा पेंटीग काम करण्याचा व्यवसाय असून गेल्या फेब्रवारी महिन्यात भामट्यांनी संशयितांशी संपर्क साधला होता. इंगळे आर्थीक अडचणीत असल्याने संशयितांनी त्यांना ऑनलाईन फुकटचे कर्ज मिळवून देण्याचे ग्वाही दिली. इंगळे यांच्या मोबाईल मध्ये आॅनलाईन कर्ज पुरविणारे दोन अॅप डाऊनलोड केले. या अॅपच्या माध्यमातून भामट्यांनी इंगळे यांचे नावे असलेले महत्वाचे कागदपत्र अपलोड केले.
सदर अॅपच्या माध्यमातून इंगळे यांच्या बॅक खात्यात अनुक्रमे ६० व २० हजार असे ८० हजार रूपये जमा झाले. ही रक्कम जमा होताच संशयित कांबळे याने त्यातील ४४ हजार ५०० रूपयांची रक्कम आपल्या खात्यावर वर्ग करून घेतले. दुस-या दिवशी इंगळे यांना कॉलेजरोड येथील क्रोमा शोरूम येथे बोलविण्यात येवून त्यांच्या नावे ७४ हजार रूपयांचा आयफोन खरेदी करण्यात आले. यावेळी मोबाईल पदरात पाडून घेत संशयितांनी इंगळे यांच्या खात्यावर आठ हजार रूपये वर्ग केले. सर्व कर्ज एक महिन्याच्या आत बंद होतील अशी ग्वाही दिली. मात्र त्यानंतर सदर फायनान्स कंपन्यांकडून हप्ते भरण्याचा तगादा सुरू झाला असून या घटनेत इगळे यांची १ लाख ५४ हजाराची फसवणुक करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खताळे करीत आहेत.