नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना घडली. या घटनेत मोबाईलधारकाच्या बँक खात्यातून परस्पर एक लाख रूपयांची रक्कम लांबविण्यात आली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाराम हरी नेटारे (रा. तिरूपतीनगर दसक,जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नेटारे यांचा काही दिवसांपूर्वी मोबाईल हरवला आहे. भामट्यांनी रविवारी (दि.१५) रात्री गहाळ मोबाईलचा वापर करून बँक खात्यावर डल्ला मारला. आयसीआयसीआय बॅकेच्या बिटको शाखेत नेटारे यांचे खाते आहे.
या खात्यास सदर मोबाईलचा नंबर लिंक असून त्याचा वापर करून भामट्यांनी फोन पे आणि युपीआय आयडीच्या माध्यमातून एक लाख रूपये परस्पर लांबविले. अधिक तपास हवालदार सुळे करीत आहेत.