नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी आपल्या मित्रालाच गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. फायनान्स कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या मोबाईलचा अपहार करीत भामट्यांनी मित्रास एक रूपयाही न देता कर्ज भरण्यास भाग पाडल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक सोनटक्के (३५ रा.धनसृष्टी सोसा.इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ उपनगर) व सुमीत संजय देवरे (रा. ड्रीम कॅसेल मखमलाबादरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत हेमंत माधव आहेर (रा.पेठे हायस्कूल जवळ, रविवार कारंजा) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. आहेर यांच्या बहिणीचे लग्न असल्याने त्याने ओळखीच्या प्रतिक सोनटक्के या मित्राची भेट घेतली होती. बॅक कर्जाबाबातच्या चौकशीत सोनटक्के याने मोबाईल खरेदीच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिल्याने ही फसवणुक झाली. गेल्या २१ फेब्रुवारी रोजी भामट्याने आहेर यांना क्रोमा शोरूम येते बोलावून घेत त्यांच्या नावावर आयसीआयसीआय बँकेकडून फायनान्स करून घेत सुमारे ७५ हजार रूपये किमतीचा आयफोन व १५ हजार ५०० रूपये किमतीचा अन्य एक मोबाईल खरेदी केले.
सदरचे मोबाईल सुमीत देवरे याच्या माध्यमातून विक्री करून तुला सध्याकाळ पर्यंत पैसे देतो असे सांगितल्याने आहेर यांनी विश्वास ठेवला असता ही फसवणुक झाली. भामट्याने मोबाईल पदरात पाडून घेत त्यांचा अपहार केला असून हेमंत आहे यांना नाहक हप्ते भरण्यास भाग पाडले. पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने आहेर यांनी पोलीसात धाव घेतली आहे. सोनटक्के याने यापूर्वीही अश्याच प्रकारे अनेकांना गंडविल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.
…………