नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी किटकनाशक औषधांचा साठा चोरून नेला. ही घटना आडगाव येथे घडली. या घटनेत सुमारे दोन लाखांच्या औषधांवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत दिनकर चेमटे (रा.नांदूर जत्रा लिंकरोड ) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. चेमटे यांचे आडगाव येथील तलाठी कार्यालय परिसरात नेहा अॅग्रो एंटरप्रायझेस नावाचे फर्टिलायझरचे दुकान आहे. गाळा क्र. १ व २ मध्ये असलेल्या दुकानांचे शनिवारी (दि.१४) रात्री पत्रा उचकटून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या भामट्यांनी सुमारे १ लाख ९० हजार रूपये किमतीचा किटकनाशक औषधांचा साठा चोरून नेला असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
……..
वडाळानाका येथे दगडफेक केल्याची घटना
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किरकोळ कारणातून त्रिकुटाने दहशत माजवित दगडफेक केल्याची घटना वडाळानाका येथील महालक्ष्मी चाळीत घडली. या घटनेत घरांवर दगडफेक करण्यात आल्याने दोन जण जखमी झाले असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण राजू लोट, अर्जुन राजू लोट व प्रिन्स गोगालीया (रा.सर्व महालक्ष्मीचाळ,वडाळानाका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत भारती ताराचंद्र पवार (रा.सदर) या महिलेने फिर्याद दिली आहे. पवार यांच्या मुलास संशयितांनी रविवारी (दि.१५) सकाळी फोन करून शिवीगाळ केली होती. सकाळी आमच्या विरूध्द जास्त बोलत होता या कारणाची कुरापत काढून संशयितांनी फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास अचानक पवार व परिसरातील नागरीकांच्या घरावर दगडफेक करीत दहशत माजविली. या घटनेत तिलक बिगानीया व जेयश्री बेनवाल हे जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.