नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून पैसे काढून वाहनाच्या दिशेने जाणा-या बापलेका पैकी मुलाची हातातील पैश्यांची पिशवी दुचाकीस्वार भामट्याने हिसकावून नेल्याची घटना नाशिकरोड येथील दत्तमंदिर भागात घडली. या घटनेत ४ लाख ६४ हजार रूपयांच्या रोकडवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश नामदेव म्हस्के (५४ रा.कोटमगाव ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. म्हस्के दुर्धर आजाराने पीडित असून त्यांचे ऑपरेशन करावयाचे असल्याने ते हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यापूर्वी मुलास सोबत घेवून बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता ही घटना घडली. दिनेश म्हस्के व दर्शन म्हस्के हे बापलेक सोमवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास पैसे काढण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या दत्तमंदिर शाखेत गेले होते.
दीड वाजेच्या सुमारास दोघे पैसे काढून बँके समोर पार्क केलेल्या आपल्या वाहनाच्या दिशेने जात असतांना पल्सरवर आलेल्या भामट्याने दर्शन म्हस्के याच्या हातातील पैश्यांची पिशवी हिसकावून नेली. या पिशवीत ४ लाख ६४ हजार ७०० रूपयांची रोकड होती. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुयोग वायकर करीत आहेत.