नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी आत्महत्या केली. त्यात दोन युवतींचा समावेश असून त्यातील तीन जणांनी गळफास लावून घेत तर एकाने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. याप्रकरणी अंबड इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लेखानगर येथील इंदिरानगर वसाहत क्र. एक मध्ये राहणाºया वैशाली भारत दांडेकर (२८) या युवतीने शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटुंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.
दुसरी घटना चुंचाळे शिवारात घडली. रामेश्वर चांगदेव चव्हाण (३२ रा.भोर टाऊनशिप म्हाडा वसाहत) यांनी शुक्रवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. पत्नी शालू चव्हाण यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार शेख व झोले करीत आहेत.
तिसरी घटना राजीवनगर झोपडपट्टीत घडली. वैष्णवी मारूती वडमारे (२०) या युवतीने शुक्रवारी दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी पाईपाला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. मावसा दगू शेळके यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार डोळस करीत आहेत.
चौथी घटना नाशिक पुणे रोडवरील म्हसोबावाडी भागात घडली. राजेंद्र तुकाराम मोरे (४७ रा.बनकर मळा,सीटी केअर हॉस्पिटल जवळ) यांनी गुरूवारी (दि.१२) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या सुमन हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून शुक्रवारी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.








