नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फर्निचर व किचन ट्रॉली बनविणा-या एका व्यावसायीकाने ग्राहकाची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑर्डरच्या व्यवहारात टोकन घेवूनही फर्निचर आणि किचन ट्रॉली न बसविल्याने ग्राहकाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल शरद कोळी (रा.धुळे) असे संशयित व्यावसायीकाचे नाव आहे. याबाबत ज्ञानेश्वर सिताराम महाजन (रा.ओझर ता.निफाड) यांनी फिर्याद दिली आहे. महाजन यांना आपल्या घरात फर्निचर व किचन ट्रॉलीचे काम करायचे असल्याने त्यांनी गेल्या वर्षी संशयिताशी संपर्क साधला होता. संशयिताने घरी येवून फर्निचरच्या मोजमापसह किचन ट्रॉलीच्या कामाचेही रक्कम ठरवली होती.
या व्यवहारापोटी ७६ हजाराचे टोकन देण्यात आले होते. संशयितांनी तात्काळ ११ हजार रूपये किमतीची टाईल्स महाजन यांच्या घरी आणून ठेवली मात्र त्यानंतर त्याने कामाकडे पाठ फिरवली. वर्ष उलटूनही काम न करता त्यांने टोलवाटोलवी केल्याने महाजन यांनी पोलीसात धाव घेतली असून या घटनेत ६५ हजार रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.