नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भागीदारीचे आमिष दाखवून आग्रा येथील दोघांनी एका महिलेस गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अमानत रक्कम स्विकारूनही टेंडर न दिल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पेंद्र त्यागी व नंदन हजरा (रा.दोघे सिकंदरा बोदलारोड आग्रा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत वृषाली गणपत दुबे (रा.जत्रा नांदूर लिंकरोड आडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दुबे यांची गेल्या वर्षी संशयितांशी भेट झाली होती. संशयित पुष्पेंद्र त्यागी यांनी पी.के.एज्युकेशनल ट्रस्ट कंपनीच्या चेअरमन असल्याची बतावणी करीत ट्रस्टच्या माध्यमातून भारतभर कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातील कामांसाठी भागीदार शोधत असल्याचे सांगितले. यावेळी महिलेने तयारी दर्शविली असता ही फसवणुक झाली.
दोघा संशयितांनी १२ सप्टेंबर रोजी महिलेचे घर गाठून तिला भागीदारी देण्याची ग्वाही दिली. या मोबदल्यात दोन लाख रूपये ट्रस्टच्या बँक खात्यात सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर संपर्क तोडला. वेळोवेळी महिलेने संपर्क साधूनही त्यांनी टाळाटाळ केली. आठ महिने उलटूनही राज्यातील कामाचे टेंडरही मिळाले नाही तसेच डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कमही परत न केल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.