नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात तोतयागिरी वाढली असून, भामटे वेगवेगळे बहाणे करून महिला व वृध्द पुरूषांना गाठून दागिणे लांबवित आहेत. पंचवटी व सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या दोन दिवसात तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून त्यात भामट्यांनी सव्वा तीन लाख रूपये किमतीचे दागिणे लांबविले. याप्रकरणी पोलीस दप्तरी ठकबाजीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मखमलाबादरोडवरील सुमन काकड (रा.मोरेमळा रामनगर) या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी (दि.११) सकाळी त्या दिंडोरीरोडवरील भाजीमार्केट मध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. पेठनाका येथील सिग्नलजवळून त्या पायी जात असतांना ही घटना घडली. अज्ञात दोन जणांनी त्यांना गाठले. आजी रस्त्याच्या बाजूला अन्नदान सुरू असून तुम्हाला द्यायला सांगतो असा बहाणा करून भामट्यांनी काकड यांना पंचवटी वॉईन शॉप जवळ नेले. मुक्ताई ट्रेंडर्स येथे अंगावरील अलंकार काढून ठेवण्याचा सल्ला देत भामट्यांनी काकड यांचे मंगळसूत्र, डोरले व कानातील टॉप्स असा सुमारे ४० हजार रूपये किमतीचा ऐवज हातोहात लांबविले.
दुसरी घटना पेठरोडवरील दत्तनगर भागात घडली. मनोहर किसन ढुमणे (५९ रा.दत्तनगर पंचवटी) हे गुरूवारी (दि.१२) सकाळी नेहमीप्रमाणे परिसरातील दत्तमंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. प्रवेशद्वाराजवळच दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. सीबीआय ऑफिसर असल्याची बतावणी करीत भामट्यांनी त्यांना या भागात गळयावर चाकू मारून दागिणे लांबविले जातात त्यामुळे तुम्हीही अलंकार काढून ठेवा असा सल्ला देत ही फसवणुक केली. दोघा भामट्यांनी मदतीचा बहाणा करून ढुमणे यांची सोनसाखळी दोन सोनच्या व एक चांदीची अंगठी हातोहात लांबविली. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सचिन आहिरे व सानप करीत आहेत.
तिसरी घटना जुने सिबीएस भागात घडली. पाळे खुर्द ता. कळवण येथील अलका देसाई (६४) या वृद्दा बुधवारी (दि.११) न्यायालयीन कामकाजानिमित्त शहरात आल्या होत्या. जिल्हा न्यायालयातील कामकाज आटोपून त्या दुपारच्या सुमारास घरी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकाच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. पदमा हॉटेल समोरील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ तीन जणांच्या टोळक्याने त्यांना गाठले. भामट्यांनी बोलण्यात गुंतवून देसाई यांच्या गळयातील सुमारे एक लाख ७० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.