नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत आडगाव,मुंबईनाका, नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटारसायकल चोरीची पहिली तक्रार आडगाव शिवारात राहणारे अंकुश शशिकांत टर्ले (रा. अनुष्का अपा. जत्रा हॉटेल समोर महालक्ष्मीनगर) यांनी दिली आहे. टर्ले यांची पल्सर एमएच १५ जेजी ९२०५ गेल्या बुधवारी (दि.४) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
दुसरा प्रकार द्वारका भागात घडला. एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी किरण दिपक पगार (रा.हरिहर बाग, द्वारका) यांनी फिर्याद दिली आहे. पगार व सोसायटीतील अभिजीत चौधरी यांच्या एमएच १५ जेवाय ०१९० आणि एमएच १५ डीडब्ल्यू ३५११ चोरट्यांनी पळवून नेल्या. ही घटना शुक्रवारी (दि.६) रात्री घडली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
तिसरी घटना नाशिकरोड येथील रेल्वेस्थानक परिसरात घडली. याबाबत दत्त्तात्रेय किसन निमसे (रा. नांदूर पो.मांडसांगवी ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. निमसे गेल्या रविवारी (दि.८) नाशिकरोड भागात गेले होते. रेल्वेस्टेशन नजीकच्या कदम पेट्रोल पंपाच्या कंपाऊड जवळ त्यांनी आपली ड्युओ एमएच १५ ईएन ६८२५ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.
तर नरसिंह बबनराव डहाळे (रा.वैभव लक्ष्मी लॉन्स जवळ करंजकरनगर दसक) यांची एमएच ४४ एक्स ०९७७ मोटारसायकल गेल्या मंगळवारी (दि.३) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.