नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑनलाईन जुगार खेळणे एका तरूणास चांगलेच महागात पडले आहे. वेबसाईटवर जुगार खेळल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला असून यात तरूणाची ५ लाख रूपयांची फसवणुक झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येनजू छबिलाल थापा (रा.टागोरनगर) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. थापाला गेल्या ९ मे रोजी मोबाईलवर भामट्यांनी संपर्क साधला होता. वेबसाईटच्या माध्यमातून गेम खेळल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे त्यास आमिष दाखविण्यात आले. यानंतर संबधीतांनी सुचविलेल्या वेबसाईटवरील येनजू थापा याने जुगार खेळला असता ही फसवणुक झाली.
संशयितांनी थापा यास जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत संशयितांनी वेबसाईटवर देण्यात आलेल्या बँक खात्यावर त्यास पैसे करण्यास भाग पाडण्यात आले. सुमारे ५ लाख ४ हजार २४० रूपये बोली लावूनही भामट्यांनी त्यास एकदाही जिंकू न देता त्याची फसवणुक केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.
……….