नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– किरकोळ कारणातून सिटी लिंक बसचालक व कारचालक कुटूंबियांत मंगळवारी (दि.३) सायंकाळी तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार द्वारका सर्कल भागात घडला. या घटनेत अश्लिल हावभाव करीत बसचालकाने मारहाण केल्याचा तर कारचालकाने मारहाण करीत मोबाईल फोडल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर येथील कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार द्वारका परिसरा सिग्नलवर कार थांबलेली असतांना पाठीमागून आलेल्या एमएच १५ जीव्ही ७९९६ या सीटी लिंक बसने कारला धक्का लावला. यावेळी कुटूंबियाने बसचालकास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता चालकाने कारमधील महिलांकडे बघून अश्लिल हावभाव केले. तसेच चालक मुलास शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे म्हटले आहे.
तर बसचालक दिपक मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, द्वारका सर्कल भागात सिग्नल पडल्याने बस पुढे घेतली असता एमएच ०२ बीझेड ६४०९ या कारमधील प्रफुल्ल व निजय नंदन यांनी प्रतीबंध करीत बसच्या कॅबीनमध्ये शिरून शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी संतप्त दोघांनी मोरे यांचा मोबाईल हिसकावून घेत फोडल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रहिरे व बाविस्कर करीत आहेत.