नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केवायसी अपडेटच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी शहरातील एका बँक ग्राहकाच्या खात्यावर डल्ला मारला आहे. लिंकच्या माध्यमातून दीड लाख रूपयांची रक्कम भामट्यांनी परस्पर लांबविली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश भुषण पलोड (२९ रा.अनमोल नयनतारा,तिडके कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पलोड गेल्या १० जुलै रोजी आपल्या घरी असतांना त्यांच्याशी ७७०९९४३८०९ व ७३८४५०९३१६ या मोबाईल नंबर धारकांनी संपर्क साधला होता. बँकेची केवायसी अपडेट करावयाची असल्याचे सांगून पाठविलेल्या लिंकवर माहिती भरण्यास त्यांना भाग पाडले.
पलोड यांनी मोबाईलवर आलेली लिंक उघडून स्व:ताची गोपनिय माहिती भरली असता त्यांच्या एसबीआय बँकेच्या महात्मानगर शाखेतील करंट अकाऊंटमधून १ लाख ४९ हजार ९९७ रूपये परस्पर काढून घेतले. ही बाब निदर्शनास येताच पलोड यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.