नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कर्ज फेडण्यासाठी एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने मित्राचेच घर फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. शहर पोलीसांनी २५ किमी अंतरावरील सीसीटिव्ही यंत्रणेची पडताळणी करीत पोलीस रेकॉर्ड वरील चौघाना बेड्या ठोकल्या असून त्यात ही बाब पुढे आली आहे. या कारवाईत चोरट्यांकडून सुमारे ३८ लाख ५८ हजार ७०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नावीद अल्ताफ हाशमी (२५, रा. नागजी हॉस्पिटल चौक द्वारका नगरी), शेहबाज जावेद खान (२९, रा. श्रीजी अपा. वडाळा रोड), उत्तम धोंडीराम मुंजे (३०, रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) व महेश मधुकर व्यवहारे (२७, रा. पाचआळी त्र्यंबकेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पखाल रोडवरील गुलशन कॉलनीत राहणारे अंजुम बिसमिल्ला कुरेशी यांचे घर चोरट्यांनी दि. २४ ते २६ मे दरम्यान फोडले होते. या घटनेत भामट्यांनी दोन लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांवर डल्ला मारला होता. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने स्थानिक पोलीसांसह शहर गुन्हे शाखेचे युनिट १ व २ ची पथके कामाला लागली होती. पथकांनी परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी करीत थेट २५ किमी अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढला. त्यात वरिल संशयित निष्पन्न झाल्याने पोलीसांनी त्याचा शोध सुरू केला.
युनिट १ चे अंमलदार आप्पा पानवळ व मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांना त्र्यंबकेश्वर ते पहिने रोड दरम्यान सापळा लावून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संशयितांच्या ताब्यातील वाहनांसह चोरीचे सोन्याचांदीचे अलंकार असा सुमारे ३८ लाख ५८ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्यसंशयित नाबीद हाशमी हा तक्रारदारच्या मुलाचा मित्र असून त्याने मोबाईलसह गृहकर्ज फेडण्यासाठी आपल्या मित्राचे घर फोडल्याची कबुली दिली आहे.